वेतन कपात केल्याने रुग्णालयाबाहेर आंदोलन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात आरोग्य मंत्रालय तसेच राज्य सरकारने बंधपत्रित परिचारिकांच्या वेतनात कपात केली आहे. या पगार कपातीमुळे ४५ हजारांवरून वेतन थेट २५ हजार केल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आज परिचारिकांनी आंदोलन केले. अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या समोरच परिचारिकांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले.
कोरोना सारख्या महारोगराईत राज्य सरकारने परिचारिकांच्या वेतनात कपात केली असून आम्हाला आमचा पूर्ण वेतन देण्यात यावा. तसेच राज्य सरकारने २०१५ पासून २०२० पर्यंतच्या सर्व बंधपत्रित परिचारिकांना शासन सेवेत कायम करून घ्यावे या मागण्यासाठी आज बंधपत्रित परिचारिकांनी जिल्हा रुग्णालयाच्या समोरच काम बंद आंदोलन केले.
दरम्यान २००० ते २०१५ पर्यंतच्या परिचारिकेंच्या सेवा नियमित करण्यात आल्या मात्र २०१५ पासूनच्या सर्व परिचारिकांना थेट घरचा रास्ता दाखवण्याचे षडयंत्र आरोग्य सेवा संचालनालय व आरोग्य मंत्रालयमधील काही मनमानी कारभार करणाऱ्या नोकरशहाकडून होत आहे. वास्तविक पाहता आरोग्य मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर शासनाचे नियंत्रण दिसून येत असून शासनाने बंधपत्रित परिचारिकांना लवकरात लवकर शासन सेवेत कायम करून वेतन कपात न करण्याची मागणी करत आरोग्य संचालनालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या निषेधार्थ आज परिचारिकांच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या संकटात डॉक्टर आणि नर्सेस या दिवस-रात्र काम करुन रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, त्याच दरम्यान या नर्सेसच्या पगारात कपात केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनाची राज्यातील स्थिती
राज्यात रविवारी १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.