”नाशिक मधील कंत्राटी कामगारांचं अनोखे आंदोलन

नाशिक : प्रशासनाचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील कंत्राटी सफाई कामगारांनी स्वत:ला जमिनीत अर्ध गाडून घेत आंदेलन केलं. वारंवार मागणी करुनही प्रशासन कंत्राटी सफाई कामगारांच्या मानधनाच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत असल्याने या कामगारांनी स्वत:ला कमरेपर्यंत जमिनीत गाडून घेतलं.
गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर नगर परिषद मधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. अगदी तोडक्या मनधनात हे कर्मचारी काम करत आहेत. वारंवार मागणी करुनही प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे आज या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःला कमरेपर्यंत जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं. अवघ्या 3 ते 4 हजारात काम करा, अन्यथा घरी बसा, असं सांगितल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘कोरोनाच्या या महामारीत आम्ही जीव धोक्यात घालून काम करत असतानाही इतक्या कमी मानधनात काम कस करायचं’, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनात प्रहार संघटनेने ही सहभागी होत संबंधित कंत्राट दाराचा आणि त्यात हस्तक्षेप करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी अनेक सफाई कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आता त्र्यंबकेश्वर प्रशासन या कामगारांच्या मागण्या पूर्ण करणार का, याकडे सध्या या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून आहे.