‘नो मोअर लाईफ लॉस’ केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला नवा मंत्रा दिला

पुणे : आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला ‘नो मोअर लाईफ लॉस’ हा खबरदारीचा नवा मंत्रा दिला आहे. “पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी यापुढे एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू होणार नाही याची महापालिका प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ‘नो मोअर लाईफ लॉस’ हा पुण्यासाठीचा नवा नारा असेल”, असा सल्ला आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला दिला आहे.

पुण्यातील कोरोना स्थितीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथकाने काल दिवसभर कंटेन्मेंट झोनची पाहाणी केली. यावेळी या पथकाने पुणे महापालिकेला काही नव्या उपाययोजना सूचवल्या. आज स्मार्ट सिटीच्या कार्यालयात केंद्रीय समितीकडून कोरोनाच्या वॉर्डनिहाय डॅशबोर्डची पाहाणीही केली.

देशभरात ज्या शहरांनी कोरोना काळात उत्तम नियोजन केलं, त्याची चाचपणी करुन एक मॉडेल तयार करण्याचं काम केंद्रीय समिती करणार आहे. लोकसहभाग वाढवा , लोकांचा प्रतिसाद वेगाने मिळायला हवा. कोरोनातून बरे झालेल्या लोकांना संरक्षण द्या, त्यांना चांगले चेहरे म्हणून प्रमोट करा खासगी रुग्णालयातील बेडस उपलब्धता पारदर्शी हवी, रुग्णांना बेड अभावी शोधाशोध करावी लागू नये यासाठी सतत मॉनिटरिंग करावे. केसेस ॲडमिनिस्टरेशनचं क्रिटीकल ॲनालिसीस करा, ॲम्ब्युलन्स मिळण्यापासून ते रुग्णालयात उपचार मिळेपर्यंतच्या वेळेच्या नोंदी घेऊन सुधारणा करणारी यंत्रणा उभी करा, अशा सूचना केंद्रीय पथकाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

Latest News