जागतिक बँकेचे भाकीत: मोठी आर्थिक मंदी येऊ शकते

नवी दिल्ली – दुसऱ्या जागतिक युद्धानंतर यंदा प्रथमच जगात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, असे भाकीत जागतिक बँकेने वर्तवले आहे. १८७० नंतर प्रथमच एखाद्या महामारीमुळे एवढी मोठी जागतिक आर्थिक मंदी येणार असल्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मलपस यांनी म्हटले आहे. याशिवाय यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत ५.२ टक्के घसरण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक बँकेने सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात १८७० नंतर जगात पहिल्यांदाच मोठी आर्थिक मंदी येणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे सर्व देशांच्या आर्थिक व्यवस्थांना त्याचा मोठा फटका बसला. विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे, असे डेव्हिड मलपस यांनी म्हटले आहे. मागणी, पुरवठा, व्यापार आणि फायनान्स या सर्व आघाड्यांवर कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे २०२० मध्ये जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. जागतिक व्यापार, पर्यटन आणि कमोडिटी यांना याचा फटका बसला आहे. यातून अर्थव्यवस्था लवकर उभारी घेईल असे वाटत नाही, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. यापूर्वी १८७०, १८७६,१८८५, १८९३, १९०८, १९१४, १९१७ ते २१, १९३० ते ३२, १९३८, १९५४-४६, १९७५, १९८२, १९९१, २००९ आणि आता २०२० अशी आतापर्यंत एकंदर १४ वेळा जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Latest News