मुंबईतील दुकानं पूर्णवेळ खुली

मुंबई – राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’च्या अंतर्गत अनेक नियमांत शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आणखी एक निर्णय घेतला आहे. मुंबईतील दुकानांना आता नियमित वेळेप्रमाणे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील सुधारित नियमावली जाहीर करत मनपाने हा आदेश जारी केला आहे.
मनपाने जारी केलेल्या आदेशनुसार मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व मार्केट, मार्केट परिसर, दुकानं आदींना पूर्ण वेळ सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी सम-विषमचा नियम पाळला जाणार आहे. त्यामुळे रस्ते, गल्ली, परिसरातील एका बाजूची दुकानं खुली राहतील. तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानं खुली केली जातील.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुनश्च हरी ओम’ असा नारा देत लॉकडाउनच्या नियमांत हळूहळू शिथिलता आणली जात आहे. यात खासगी आणि शासकीय कार्यालये सुरू करण्यास परवानगी देत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निकष सांगण्यात आले आहेत. शिवाय जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकला देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामध्ये अटी लागू करत त्यांचं पालन करण्याचं आवाहन नागिरकांना करण्यात आलं आहे.