सोलापुरात कैद्याचे पत्र : माझ्या शरीरावर ‘कोरोना’ संशोधन करा…

hand praying in jail
सोलापूर : माझ्या शरीरावर ‘कोरोना’ संशोधन करा, अशी तयारी सोलापुरात पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याने दर्शवली आहे. माढ्याच्या तहसीलदारांना त्याने यासंदर्भात पत्रही लिहिले आहे.
‘कोरोना विषाणूवर अद्याप लस उपलब्ध नाही. संशोधक, डॉक्टर प्राण्यांवर चाचणी करत आहेत. त्याऐवजी माझ्या शरीरावर संशोधन करा, अशी इच्छा कारागृहातून पॅरोलवर आलेल्या सोलापुरातील कैद्याने व्यक्त केली आहे.
कुर्डुवाडीतील युवकाने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. समाजहितासाठी जीवन उपयोगी व्हावं, या हेतूने हा निर्णय घेतल्याचं त्याने पत्रात नमूद केलं आहे.
संबंधित युवक औरंगाबादच्या पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा युवक पॅरोलवर बाहेर आहे.
सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात एकूण 401 कैदी होते. कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तुरुंगातील 84 कैदी पॅरोलवर सोडण्यात आले आहेत. जे वेळेवर कारागृहात हजर झाले होते अशांना पुन्हा पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यातील 60 कारागृहातील अंडर ट्रायल कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार दिवसांपूर्वी दिली होती. कारागृहात 38 हजार कैदी असून त्यातील 17 हजार कैद्यांना कमी करायचे आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. तर पुढील 7 हजार कैद्यांना लवकरच सोडणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं होतं.