भाजपकडून राजस्थानात काँग्रेस व अपक्ष आमदारांवर लक्ष- काँग्रेस आमदार महेश जोशी

भोपाळ – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना राजस्थानात मात्र भाजपा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात मश्गुल आहे. राजस्थानमध्ये मोठे आर्थिक प्रलोभन दाखवत काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना फोडण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. तशी तक्रारच राजस्थान विधानसभेचे मुख्य प्रतोद आणि काँग्रेस आमदार महेश जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.

आमदार महेश जोशी यांनी भाजपचे थेट नाव न घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. काही काँग्रेस आमदारांना
आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांची सौदेबाजी केली जात आहे. त्यासाठी त्यांना सतत फोन करून मोठे आमिष दाखवले जात आहे. लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे जोशी यांनी या पत्रात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी त्यांना पत्र मिळाले असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यात १९ जून रोजी राज्यसभा निवडणुका आहेत. तीन जागेसाठी या निवडणुका होणार असून यापैकी दोन जागा काँग्रेस आणि एक जागा भाजप जिंकू शकतो. तरीही भाजपने एक ऐवजी दोन उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसमध्ये क्रॉस वोटिंगची परिस्थिती निर्माण केली आहे.