युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा- रोहित पवार

मुंबई : योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. आपण असेच घरात बसून राहिलो, तर या संकटाची उंची एवढी वाढेल की त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल. त्यामुळे युवकांनो, आता आपल्या पालकांवर जबाबदारी टाकू नका, कोणतंही काम लहान-मोठं न समजता स्वीकारा, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

‘कोरोनाला हरवण्यासाठी लॉक डाऊन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉक डाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणलीय. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे. पण योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. कारण गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठतोय. आपण असेच घरात बसून राहिलो तर या संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल.’ असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

‘मुलांनी आता पालकांवर जबाबदारी न टाकता त्यांची काळजी घेऊन आणि स्वतः पुढं येऊन जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण वयोमानानुसार शुगर, किडनी, हार्ट, मधुमेह, दमा, रक्तदाब अशा प्रकारचे आजार पालकांना असू शकतात. त्यामुळे अशा पालकांनी तसंच गर्भवती महिला व 55 वर्षांपुढील नागरिक यांनी स्वतःची काळजी घेऊन मुलांना नोकरीसाठी पाठवणं फायद्याचं होऊ शकतं. पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोर पाळून पुन्हा घरी जाणं टाळायला पाहिजे.’ असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.

‘आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहीत नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. पण आपण असेच घरात बसून राहिलो तर अडचणी वाढू शकतात. कंपन्यांमध्ये तरुणांना बोलावलं तर ते लगेच कामावर जॉईन होण्यास तयार नसतात. काहीजण सवडीने किंवा दोन महिन्यांनी किंवा कोरोना संपल्यावर जॉईन होऊ असं सांगतात. पण मला वाटतं कामाच्या बाबतीत जर आपण अशी कारणं देत बसलो तर ते आपल्याच नुकसानीचं होईल. म्हणून उलट कोरोनाच्या भितीला झुगारून देऊन काम करावं लागेल.’ असं रोहित पवार म्हणतात.

‘याचा अर्थ असाही नाही की पुन्हा पहिल्यासारखंच रहायचं. उलट यापुढं आपलं सार्वजनिक जीवनातील वर्तन, वावर हे अधिक जबाबदारीने ठेवावा लागणार आहे. नियम आणि शिस्त याची लक्ष्मणरेषा कोणालाही ओलांडता येणार नाही. फेरफटका मारण्यासाठी किंवा सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर जाण्याच्या सवयीला मुरड घालून अनावश्यक बाहेर पडून गर्दीचा एक भाग होणं टाळावं लागेल. ‘मला स्वतःला कोरोना झाला आहे म्हणून त्याचा दुसऱ्याला संसर्ग होऊ नये’ व ‘इतर सर्व लोकांना कोरोना झाला असल्याने त्याचा संसर्ग मला व्हायला नाही पाहिजे’, असं प्रत्येकाने समजून काळजी घ्यावी लागणार आहे. पण त्याऐवजी आपण घाबरून घरात बसलो तर आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय, याचीच अधिक भीती वाटते.’ असं रोहित पवार यांनी लिहिलं आहे.

Latest News