नेपाळकडून अंदाधुंद गोळीबार

नवी दिल्ली – भारत आणि नेपाळमध्ये सुरू असलेला सीमावाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भारत नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांकडून हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबार चार भारतीय जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे. या जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत-नेपाळ सीमेवर असणाऱ्या बिहारमधील सीतामढी या गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नारायणपूर आणि लालबन्दी या सीमाभागात ही घटना घडली. येथे काही जण शेतात काम करत असताना नेपाळच्या दिशेहून हा गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोघांची स्थिती गंभीर आहे. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाले आहेत. आधीच भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये लिपूलेख आणि काली नदीवरून सीमा वाद उफाळून आला आहे.

नेपाळने आपल्या देशाचा नकाशा बदलून भारताचे अनेक सीमावर्ती भाग आपल्या देशांमध्ये सामील केले आहेत. त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. नेपाळने भारताचा लिंपीयाधुरा, लीपूलेख, कालापाणी, गुंजी, नाभी, आणि काटी अशा भागांचा 395 चौरस किलोमीटरचा प्रदेश आपलाच आहे, हे सांगणारा नकाशा संसदेमध्ये मंजूर केला आहे. चीनच्या सांगण्यावरूनच नेपाळ हा भारताच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला आहे. सध्या नेपाळमध्ये भारत विरोधी ज्वर भडकविण्यात आला आहे. नेपाळी जनतेची माथी भारताविरोधी भडकविण्यात येत आहेत.

त्यामुळेच आज भारत नेपाळ यांच्या सोनबरसा सीमेवर नेपाळी पोलिसांनी भारतीय नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. नेपाळी पोलिसांनी ज्या गावावर गोळीबार केला त्या गावाचे नाव जानकीनगर आहे. भारत नेपाळला आपला छोटा भाऊ मानत असल्याने भारताने यास सोनबरसा सीमेवर सशस्त्र पोलीस तैनात केले नव्हते. त्यामुळे नेपाळी पोलिसांना भारतातर्फे चोख उत्तर देण्यात आलेले नाही. या गोळीबाराची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेपाळचा या गोळीबारामुळे सोनबरसा सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भारतीय सैनिकांनी किंवा पोलिसांनी नेपाळच्या पोलिसांवर तात्काळ कारवाई केली नाही, तर या सोनबरसा सीमेलगत भारत आणि नेपाळच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष पेटू शकतो.

Latest News