पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासातील 2 अधिकारी बेपत्ता

इस्लामाबाद – भारताच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरु असतानाच इस्लामाबादमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयासोबत काम करणारे दोन अधिकारी गेल्या काही तासांपासून बेपत्ता आहेत. सकाळी ८.३० वाजल्यापासून या कर्मचाऱ्यांसोबतचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे भारताने पाकिस्तान सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.

सीआयएसएफचे दोन वाहन चालक कर्तव्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याआधी भारतीय राजनयिक गौरव अहुवालिया यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून त्रास दिला जात असल्याचे समोर आले होते. गौरव अहुवालिया यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अहुवालिया यांचा बाइकस्वाराकडून पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याशिवाय त्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर संशयास्पद हालचाली करत असलेल्या काही अज्ञात व्यक्ती आढळल्या दिसल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील दोन व्हिसा सहाय्यकांना ताब्यात घेतले होते. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गोपनीय माहितीची हेरगिरी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर भारताने या अधिकाऱ्यांना पर्सोना-नॉन ग्रेटा जाहीर करत पाकिस्तानला पुन्हा पाठवले.

Latest News