अज्ञानापेक्षा ”अहंकार” धोकादायक हे लॉकडाउनने सिद्ध केले

नवी दिल्ली: कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आजही राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. हे टीकास्त्र सोडताना राहुल गांधी यांनी थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे एक वाक्य ट्विटरवर शेअर केले आहे. अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे असे अल्बर्ट आइनस्टाइन म्हणतात आणि हे या लॉकडाउनने सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

या पूर्वी राहुल गांधी यांनी लॉकडाउन असतानाही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कशी वाढते आहे, हे दाखवून देण्यासाठी चार ग्राफ ट्विट केले होते. देशात वारंवार लॉकडाउन लागू केले जात आहेत, मात्र त्यांचा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. उलट करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेच आहे, असे राहुल गांधी यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ग्राफ्ससोबत अज्ञाताच्या नावे एक वाक्य देखील शेअर केले होते. ‘वेडेपणा हा पुन्हा पुन्हा एकच काम करत आहे आणि विविध परिणामांची अपेक्षा करत आहे. असे ते वाक्य होते. जेव्हा पहिल्यांदा देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला, तेव्हा देशभरात फक्त ९ हजार करोनाबाधित रुग्ण होते, असे राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या ग्राफच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढील लॉकडाउनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जाऊन ती २८ हजारांवर जाऊन पोहोचली. त्या प्रमाणे जेव्हा देशात तिसऱ्यांदा लॉकडाउन लागू करण्यात आला, त्यावेळी करोनाबाधितांची संख्या ४५ हजारांवर पोहोचली होती. तर देशात जेव्हा चौथा लॉकडाउन लागू करण्यात आला, त्यावेळी करोनाबाधितांची संख्या ८२,५०० वर पोहोचली होती.

Latest News