उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

मुंबई – ‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखाबाबत बोलताना ‘व्यवस्थित माहिती मिळवून लिखाण असावं’, असे म्हणत ‘मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर चांगला अग्रलेख येईल’, असेही त्यांनी सांगितले.

तसेच ‘कोणत्याही बदलासाठी आम्ही आग्रही नाही आहोत. राज्यातील जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. खाटेचं किमान ऐकूण तरी घ्यावं. त्याने शंकेचं निरसन तरी होईल’, असे थोरात म्हणाले. दरम्यान, प्रशासनातील अधिकाऱ्यांवरुन काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आज बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. याआधी बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘आम्ही बदल्यांसाठी आग्रही नाही आहोत. तर राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा आमची आहे. खाटेची कुरकुर ऐकूण घ्यावी. मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही आमची भूमिका मांडू. काँग्रेस भक्कमपणे आघाडीसोबत आहे. सामनाने अपूर्ण माहिती घेऊन अग्रलेख लिहिला आहे. आजच्या अग्रलेखातून काँग्रेसबद्दलची चूकिची माहिती गेली आहे. आमचं म्हणणं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री समाधानी होतील. आमची भेट झाल्यानंतर सामनाने अग्रलेख पुन्हा लिहावा’, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Latest News