”RTI” बाबत संभ्रम”

पिंपरी -‘करोना’च्या प्रादुर्भावामुळे आरटीई (शिक्षण अधिकार) प्रवेश प्रक्रियेला जून महिन्याचा उतरार्ध उलटला तरी अद्याप मुहूर्त लागलेला नाही. राखीव जागांची सोडत काढल्यानंतर मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नाही. आता सर्व खाजगी शाळांची खुली प्रवेश प्रक्रिया संपली असून राज्य बोर्डाच्या शाळांचे प्रवेश सुद्धा संपत आले आहेत. एकीकडे अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे ‘आरटीई’च्या माध्यमातून आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्याच्या तयारीत असलेल्या पालकांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.

आर्थिक दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांना आरटीईनुसार इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. पिंपरी-चिंचवड शहरातून या प्रवेश प्रक्रियेयासाठी 662 शाळांपैकी 169 शाळा प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या. आरटीई आंतर्गत शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते. मात्र प्रवेशाची यादी जाहीर झाल्यानंतर ‘लॉकडाऊन’मुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता शाळेच्या नवीन सत्राला सुरुवातही झाली आहे. मात्र अद्यापही आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होतील, याविषयी अनिश्‍चितता आहे. त्यामुळे पालकांना शाळेत जाऊन पहिल्या वर्गामध्ये प्रवेश कसा घ्यावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शिक्षण विभागाने पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. त्यांनतर पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षण विभगातील अधिकारी सांगत आहेत. परंतु अद्याप कोणेतीही सूचना पालकांना न मिळाल्यामुळे पालक संभ्रमात आहे.

प्रतीक्षा यादीतील पालकही लटकलेलेच
शहरातील अनेक पालकांना त्यांच्या पाल्याचे प्रतीक्षा यादीत नाव असल्याचे संदेश आलेले आहेत. परंतु 25 टक्के जागेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यांचे प्रवेश निश्‍चित झाल्याशिवाय प्रतीक्षा यादीतील पालकांना प्रवेशासाठी स्थान मिळणार नाही. त्यामुळे या पालकांनाही आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खासगी शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश
करोनामुळे शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये खासगी नामाकिंत शाळांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली होती. काहीपालकांनी पाल्याचे ऑनलाइन प्रवेश घेतले
असल्याचे सांगण्यात येत आहे.

25 टक्के प्रवेशासाठी मार्च महिन्यात सोडत काढण्यात आली आहे, त्याचे मेसेज पालकांना आले आहेत. मात्र करोनामुळे आरटीईची प्रक्रिया ठप्प झाली. याबाबत शिक्षण विभागाचे आदेश आल्यानंतर आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तशी माहितीही पालकांना पाठवण्यात येणार आहे. तसेच प्रवेशाची तारीखही त्यावेळी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल.