ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळाने निधन

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीचे साक्षीदार राहिलेल्या रणदिवे यांच्या आज निधनाने पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. शोषित आणि पीडितांचा आवाज बनवण्यासाठी रणदिवे यांनी पत्रकारिता हे माध्यमं निवडलं होतं. तर या माध्यमातून त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

दिनू रणदिवे  यांच्या जाण्याने केवळ पत्रकारिता नव्हे तर महाराष्ट्राचही नुकसान झालं आहे. कामगार आणि सामाजिक चळवळीचं नुकसान झालं असून शोषितांचा आवाज मूक झाला, अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पत्रकारिता, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी रणदिवे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिनू रणदिवे यांचा जन्म १९२५ साली डहाणूतील आदिवासीबहुल भागात झाला. १९५६ सालापासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रणदिवे यांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रासाठी रणदिवे यांनी मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्ष काम देखील केलं होतं.

Latest News