भोसरीमध्ये नालेसफाई करताना वीजेच्या झटक्‍याने मृत्युमुखी पडलेल्या दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य

pcmca89

महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण

पिंपरी – भोसरीमध्ये नालेसफाई करताना वीजेच्या झटक्‍याने मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदाराकडील सफाई कामगाराच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून सोमवारी (दि. 31) दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. त्यामुळे संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण म्हणाले, बाळू सोनवणे हे महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. 30 जून 2017 रोजी नालेसफाईचे काम करत असताना त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर आपण सोनवणे कुटुंबियांना संपर्क साधला. हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध व सफाई कामगारांचे पुनर्वसन कायदा -2013 आणि

सर्वोच्च न्यायालयाच्या 2014 च्या निर्देशानुसार कार्यरत कामगार कामाच्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्याचा आधार घेत ‘प्रधान नियोक्ता’ या नात्याने महापालिका आयुक्तांना नोटीस बजाविण्यात आली.

तसेच, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी महापालिका आयुक्तांची सुनावणी घेत मृत्युमुखी कामगाराच्या कुटुंबियांना 10 लाखांचे अर्थसहाय्य देण्याचे आदेश दिले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची दखल घेत सोनवणे कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार,

सोमवारी (दि. 31) 10 लाखांचा धनादेश महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मंदा बाळू सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सफाई तक्रार निवारण समिती सदस्य अनिल चावरे, रोहित होनमाने, किशन आरजे, राजू खैरे, राजू परदेशी आदी उपस्थित होते.

Latest News