पुण्याच्या रस्त्यांवर ‘पीएमपी’ पाच महिन्यांनंतर धावली


पुणे : मागील पाच महिन्यांपासून ठप्प असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बस गुरूवारपासून मार्गावर धावू लागल्या. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ४७७ बस मार्गावर आल्या. मात्र, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एका फेरीमागे जवळपास ६ ते ७ प्रवासी मिळाले. पहिल्या दिवसाची एकुण प्रवासी संख्या ६० हजारांपर्यंत तर उत्पन्न सुमारे १० लाखांवर जाईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पीएमपी बससेवा ठप्प झाली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १२५ बस पुणे व पिंपरी चिंचवडमधील विविध मार्गावर धावत होत्या. अनलॉकमध्ये अनेक दुकाने, कंपन्या, कार्यालये सुरू झाल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर गुरूवारपासून २५ टक्के म्हणजे ४७७ गाड्या मार्गावर धावू लागल्या. पहाटे साडे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या बसला सुरूवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कार्यालयीन वेळेमध्ये प्रवाशांची संख्या वाढली. दुपार पुन्हा बस रिकाम्या धावू लागल्या. तर सायंकाळी कार्यालयीन वेळेत काही प्रमाणात गर्दी दिसून आली.
सकाळच्या सत्रात सुमारे ३४ हजार प्रवाशांनी बसचा वापर केला. त्यातून पीएमपीला सुमारे साडे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका बसला प्रतिफेरी ७ ते ८ प्रवासी मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसते. दिवसभरातील एकुण प्रवासी संख्या ६० हजारांच्या जवळपास जाऊ शकते. कोरोनापुर्वी पीएमपीचे दैनंदिन प्रवासी सुमारे १० लाख एवढे होते. सध्या बसची संख्या कमी असल्याने तसेच सुरक्षित अंतराचे बंधन असल्याने प्रवासी कमी मिळतील, हे प्रशासनाने गृहित धरले आहे. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नियमित बससेवा सुरू झाल्याने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या बस बंद करण्यात आल्या आहेत. केवळ महापालिका, ससून, वायसीएमसाठी सुरू असलेल्या बस धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.