हाथरस: केवळ वीर्य किंवा सिमेन आढळलं तरच तो बलात्काराचा गुन्हा ठरतो का?

उत्तर प्रदेशातल्या हाथरस कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी फॉरेन्सिक अहवालाचा दाखला देत पीडित मुलीवर बलात्कार झालाच नाही, असा दावा केला आहे.
गुरुवारी (1 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे अतिरिक्त उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलं होतं, “FSL (फॉरेंसिक सायन्स लेबॉरेटरी) अहवालानुसार व्हिसेरा नमुन्यात वीर्य आढळलं नाही. पोस्टमार्टम अहवालानुसार हल्ल्यानंतर जो धक्का बसला त्यामुळे मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती देऊनही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.” त्यांनी पुढे म्हटलं, “यावरून स्पष्ट होतं की, चुकीच्या पद्धतीने जातीय तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच तात्काळ कारवाई केली आहे आणि यापुढची कायदेशीर कारवाईदेखील केली जाईल.”
उत्तर प्रदेश पोलिसांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्यावर टीका होतेय.
पीडितेचा व्हिसेरा अहवाल अजून जाहीर झालेला नाही. मात्र, तरीही पीडितेवर बलात्कार झालेलाच नाही, असं सांगून उत्तर प्रदेश पोलीस मोकळे झाले.
मात्र, केवळ वीर्य किंवा सिमेन आढळलं तरच तो भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा ठरतो का? या रिपोर्टमध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
बलात्काराविषयीचा भारतीय कायदा
बलात्कार गुन्हा असल्याचं मान्य करत भारतीय दंड संहितेत (IPC) 1860 सालीच यासंबंधीची कलमं समाविष्ट करण्यात आली. आयपीसीच्या कलम 375(1) मध्ये बलात्काराची कायदेशीर व्याख्या करण्यात आली आहे.
या कलमाअंतर्गत एखादा पुरूष एखाद्या स्त्रीच्या सहमतीशिवाय किंवा बळजबरीने शरीर संबंध ठेवत असेल तर हा बलात्काराचा गुन्हा मानला जातो. यात सहमतीचीही व्याख्या देण्यात आली आहे. एखाद्या इच्छेखातर किंवा मृत्यू किंवा मारहाणीच्या भीतीने स्त्री सहमती देत असेल तर त्यालाही बलात्कारच मानलं जातं. कलम 375 मध्येच हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, संभोगावेळी केवळ ‘पेनिट्रेट’ करणं एवढंदेखील बलात्कार मानला जाईल.
कलम 376 अंतर्गत बलात्कार प्रकरणात 10 वर्षं ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
2012 सालच्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर बलात्कार आणि लैंगिक छळ संबंधित कायद्यांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. यात बलात्कार आणि लैंगिक छळाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवण्यात आली.

न्या. जे. एस. वर्मा यांच्या शिफारशींनंतर 2013 साली संसदेत गुन्हेगारी कायदा (दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात आलं. यात बलात्कार प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली.
बलात्कार प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाला किंवा ती अचेतन अवस्थेत गेली असेल तर अशावेळी मृत्यूदंडही सुनावला जाऊ शकतो.
वीर्य नाही म्हणजे बलात्कार नाही?
दिल्ली उच्च न्यायालयात गुन्हेगारी प्रकरणांचे वकील जयंत भट्ट म्हणतात की, बलात्कार सिद्ध करण्यासाठी महिलेच्या शरीरावर सिमेन किंवा वीर्य असलंच पाहिजे, असं गरजेचं नाही.
ते म्हणतात, “सिमेन किंवा वीर्य शरीरावर आढळण्यासंबंधी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल दिले आहेत. यात वीर्य आढळणं किंवा न आढळणं गरजेचं मानलं गेलेलं नाही. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर कायद्यांमध्ये जे बदल करण्यात आले त्यानंतर बलात्काराची व्याख्या बरीच व्यापक झाली आहे. आता केवळ ‘व्हजायनल पेनिट्रेशन’च नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारच्या पेनिट्रेशनचा कलम 375 आणि 376 मध्ये समावेश करण्यात आला आहे. यात बोटाने केलेल्या पेनिट्रेशनचाही समावेश आहे.”
परमिंदर ऊर्फ लडका पोला विरुद्ध दिल्ली सरकार (2014) प्रकरणात शरीरावर वीर्य आढळणे बलात्कार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी गरजेचं नसल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने काढला होता. सर्वोच्च न्यायालयानेही हा निष्कर्ष योग्य असल्याचं म्हटलं होतं.

‘द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने हाथरसचे एसपी विक्रांत वीर यांच्या हवाल्याने लिहिलं होतं की, पीडितेने 22 सप्टेंबर रोजी शुद्धीत आल्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष देत सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं.
हाथरस कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात बलात्कार झाला की नाही, यासंबंधी पोस्टमॉर्टम, FSL किंवा व्हिसेरा अहवाल बाजूला ठेवून फक्त पीडितेची साक्ष बघितली तर ती किती महत्त्वाची आहे?
या प्रश्नाचं उत्तर देताना वकील जयंत भट्ट म्हणतात, “कुठलीही पीडिता मृत्यूपूर्वी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष देत असेल तर त्याला ‘डाईंग डिक्लेरेशन’ मानलं जातं आणि मी अशा प्रकारचे जे खटले हाताळले आहेत त्यात बहुतांशवेळा न्यायालयाने पीडितेची शेवटची साक्ष खरी मानली आहे. कुठलीही व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणी खोटं बोलत नाही, असं मानलं जातं आणि म्हणूनच पीडितेची साक्ष या प्रकरणात सर्वात महत्त्वाची असणार आहे.”
जयंत भट्ट पुढे असंही म्हणतात की, या प्रकरणाकडे केवळ सामूहिक बलात्कार म्हणून बघितलं जाऊ नये. कारण यात हत्येचं प्रकरणही आहे आणि त्यासाठी मृत्यूदंडाचीही शिक्षा आहे.
FSL अहवालाच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी बलात्कार झालेलाच नाही, असं म्हटलं असलं तरी अजून पोस्टमॉर्टम अहवाल सार्वजनिक केलेला नाही. त्यामुळे त्या अहवालात बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे की नाही, हे पडताळून बघता येत नाही.
मात्र, बीबीसी हिंदीच्या फॅक्ट चेक टीमने तपास करून खात्री केलेली आहे की बलात्काराच्या प्रकरणात शरीरावर सिमेन किंवा वीर्य आढळणं गरजेचं नाही.