15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही.


नवी दिल्ली: देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपले वेगळे नियम करू शकतात असं सांगत नव्या नियमांमध्ये अनेक अटीही टाकण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही. मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. शाळांनीही स्वच्छता आणि कोविडचे सुरक्षा नियम कडकपणे पाळावे असेही शिक्षण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे
दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर रविवारी दिलं होतं. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचं लक्ष्य असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लशीबाबत सविस्तर माहिती दिली. भारतात 400-500 दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.