कोरोना संकटाच्या काळात तालुक्यातील जनतेला आम्ही मदत केली असून इतरांप्रमाणे वाऱ्यावर सोडले नाही- आमदार निलेश लंके

अहमदनगर:- पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरमध्ये जवळजवळ १ हजार २०० रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहे. जगावर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात तालुक्यातील जनतेला आम्ही मदत केली असून इतरांप्रमाणे वाऱ्यावर सोडले नाही
किराणा वाटप, अन्नदान आणि आता कोविड सेंटरच्या माध्यमातून या जागतिक संकटाच्या काळात घरात न बसता समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात केले. ह्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने ६० हजारांची लीड घेतली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत दीड लाखांच्या फरकाने निवडुन येईल, असा विश्वास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.
आ.निलेश लंके पुढे म्हणाले की, आम्ही सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये केवळ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर जुन्नर, मंचर, राहुरी, कोपरगाव शिरूर, संगमनेर या तालुक्यातीलही कोरोना बाधित रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाले होते व त्यातील अनेक रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. ह्या कोविड सेंटरमध्ये रूग्णांना दर्जेदार असे सकस जेवण दिले जात आहे. आपल्या कोविड सेंटरची तसेच येथील जेवणाची राज्यात चर्चा आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील याबाबत कौतुक केले आहे, असे लंके म्हणाले.
तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या पारनेर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास आ.लंके यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आ.लंके यांच्या समवेत डाॅ.उदय बर्वे, राहुल झावरे,अंकुश पायमोडे, दादा शिंदे, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब खिलारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.