मराठा आरक्षण सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रेंगाळलं- हर्षवर्धन पाटील


बारामती (प्रतिनिधी) : ‘योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न केल्यानेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रेंगाळलं,’ अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देण्यात आलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्याच्या सरकारने योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात अडचणी निर्माण झाल्या. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळेच, हलगजीर्मुळेच मराठा, धनगर आणि इतर समाजांचं आरक्षण रेंगाळल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. हर्षवर्धन पाटील हे बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षणाचा गोंधळ उडाल्याचा आरोप केला
‘सरकारने आरक्षणाबाबत स्वतंत्र अध्यादेश काढण्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती घ्यावी. नव्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं’ असं हर्षवर्धन पाटील यांनी सूचित केलं. प्रत्येक समाजात गरीब आणि उपेक्षित वर्ग असतो, त्याला नोकरी आणि शिक्षणासाठी संरक्षण मिळावं, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.