प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पुण्यात अटक

पुणे: वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. या तरुणावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मनोज क्षीरसागर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत असभ्य भाषेत एका तरुणाने 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

मनोज क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून खडक पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली आहे. सूरज चव्हाण (वय 34) असं या तरुणाचं नाव आहे. सूरज चव्हाण हा कात्रज इथला रहिवासी आहे. पोलिसांनी सोमवारी उशिरा अटक केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सूरज चव्हाणावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम आणि भारतीय दंड संहिता संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सूरजला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायलयाने सूरजला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली होती. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता ‘एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्यांचं आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर. राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला होता. त्यांच्या या टीकेमुळे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलनंही केली होती

Latest News