पिंपरी (दि. 11 जानेवारी 2021) पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित असणा-या दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन ॲड. अमर मुलचंदानी आणि इतर तीन संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली त्या बैठकीत या चारही जणांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. आपल्या राजीनाम्याची प्रत त्यांनी जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे सादर केली आहे. सन 1972 साली स्थापन झालेल्या दि सेवा विकास को – ऑप बँकेचे ॲड. अमर मुलचंदानी हे 2008 सालपासून या बँकेचे चेअरमन आहेत. त्यांच्या बरोबर चंद्रशेखर अहिरराव, राजेश सावंत आणि ॲड. सुनिल डोंगरे यांनी आपल्या संचालक पदाचे राजीनामे दिले आहेत. या बॅंकेच्या एकूण 25 शाखा असून दहा हजारांहून जास्त सभासद आहेत. मार्च 2019 अखेर बँकेत 700 कोटींहून जास्त रक्कमेच्या ठेवी आहेत. तसेच 520 कोटींहून जास्त रक्कमेचे कर्ज वितरण केले आहे. तसेच मार्च 2019 पर्यंत एनपीए 40 टक्के होते.