राज्याच्या पहिल्या महिला ”उपमुख्यमंत्री” सुनेत्रा पवार

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शनिवारी (31 जानेवारी 2026) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि सर्व आमदारांनी एकमताने त्यास मंजुरी दिली. “पक्षाची एकजूट राखण्यासाठी आणि अजितदादांचं स्वप्न पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनी योग्य नेतृत्व ठरतील,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.या निवडीनंतर लगेचच राजभवनावर झालेल्या सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला या पदाची जबाबदारी मिळाल्याने महिला वर्गात विशेष आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नव्या नेतृत्वाकडून स्थैर्य आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर राजभवनावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीने भरून निघाली असली तरी आता त्यांच्या हाती नेमकी कोणती खाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो खातेवाटपाचा. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ व नियोजन खाते त्यांच्याकडेच राहणार का, की ते राष्ट्रवादीतील छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांसारख्या अनुभवी नेत्यांकडे दिलं जाणार, यावर महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र पक्षातील अनेक आमदारांचा आग्रह आहे की, अजितदादांकडील सर्व महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहावीत.मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 24 ते 48 तासांत खातेवाटपाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय अनुभव नसतानाही एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्या कशा पेलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची पुढील वाटचाल राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं मानलं जात आहे.अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ व नियोजनसारखी महत्त्वाची खाती होती. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेही हीच जबाबदारी सोपवली जाणार का, की ती राष्ट्रवादीतील अन्य अनुभवी नेत्यांकडे दिली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः राज्याच्या अर्थकारभाराची धुरा कोण सांभाळणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
