पिंपरी-चिंचवडवर अजितदादांचे प्रेम, त्यांच्या निधानानंतर शहरात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शोकसभा…

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
विकासाचे चालत बोलत विद्यापीठ अजित पवार : आमदार अमित गोरखे
आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर सगळे तपासून सही कर असा बोलवून घेऊन त्यांनी मला सल्ला दिला होता. आमदार झाल्यावर आमदार साहेब असा उल्लेख करून आदर द्यायचे. विकासाचे चालत बोलत विद्यापीठ अजित पवार होते. उद्याच्या पिढीला त्यांचे काम कळणे गरजेचे आहे’.
दादा तुम्ही आम्हाला पोरक करून सोडून गेलात : राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, ‘राजकारणात कोरी पाठी असणाऱ्यांना आमदार, नामदार महापौर अशी पदे देणारे, सर्वांना घडविणारे अजितदादा असे निघून जातील हे पटत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उंची वाढवणारे ते होते. सुरुवातीपासून दादासोबत राहिलो. आज दादा तुम्ही आम्हाला पोरक करून सोडून गेलात’.
राज्याचे लोकनेते तथा उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पिंपरी-चिंचवड शहरावर अजितदादांचे पुत्रवत प्रेम होते. त्यांच्या निधानानंतर शहरात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शोकसभा झाली. या शोकसभेत ‘‘सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन’’ घडले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दि.28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुढाकाराने सर्वपक्षीय विविध सामाजिक संस्था, संघटनांची शोकसभा घेण्यात आली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या भाषणाने शोकसभेची सांगता झाली.
पिंपरी-चिंचवड शहरासह राज्याच्या विकासात प्रचंड योगदान असलेल्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रेक्षागृह भरले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दु:ख होते. सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडवले, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने हे जपले पाहिजे, अशी प्रतिक्रिया निश्चितच सभागृहात आणि शहरात उमटू लागली आहे.
महेश लांडगे यांनी 40 सेकंदात मंच सोडला…
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडवर अधिराज्य गाजविण्यासाठी महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले. या राजकीय लढाईत महेश लांडगे यांची सरशी झाली. परंतु निवडणूक निकालानंतर पंधरा दिवसांतच अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना पहाडासारखे खमके नेते महेश लांडगे देखील अत्यंत भावुक झाले. ‘‘दादा मला माफ करा..’’, असे म्हणत त्यांनी केवळ 40 सेकंदात मंच सोडला.
माजी आमदार विलास लांडे ‘अबोल’!
शहराचे नेते माजी आमदार विलास लांडे आणि अजितदादा पवार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अत्यंत मिश्कील शब्दांत अनेकदा विलास लांडे यांचा जाहीर सभेत उल्लेख करीत अजितदादा हशा पिकवताना शहरवासीयांनी पाहिले आहेत. पवार कुटुंबियांशी कायम एकनिष्ठ असलेले विलास लांडे शोकसभेत ‘‘अबोल’’ राहीले. सर्व मान्यवरांची भाषणे विलासशेठ ऐकत होते. आपल्या लाडक्या नेत्याबाबत बोलण्यासाठी त्यांचा शब्द फुटला नाही.
‘‘अजित सृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीयांचे समर्थन
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते, आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यानुसार प्राथमिक बैठक घेवून कामही सुरू केले. या प्रस्तावाला शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी समर्थन दर्शवले. किंबहुना शहराला विकासामध्ये एक नंबर बनवण्याचे स्वप्न अजितदादांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प शहरवासीयांनी केला आहे.
अजित पवारांचे जाणे मन सुन्न करणारे : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, ‘अजित पवारांचे जाणे मन सुन्न करणारे आहे. प्रभागात उद्यान विकसित करण्यासाठी निधी द्या म्हणून आम्ही पाठपुरावा केला. अजितदादांनी आराखडा समजावून घेतला आणि लगेच मान्यता दिली. दादा नॉट रिचेबल अनेकदा व्हायचे. पण आताही तसेच होऊन परत येतील अस वाटायचे. पण आले नाहीत’.
अजितदादांच्या निधनाने राज्याची मोठी हानी : आमदार शंकर जगताप
आमदार शंकर जगताप म्हणाले, ‘अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याची मोठी हानी झाली आहे. अजित पवार यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी जे करणे शक्य आहे ते केले जाईल’.
अजितदादा महान व्यक्तीमत्व : आमदार उमा खापरे
आमदार उमा खापरे म्हणाल्या, ‘सर्व विकासकामे केवळ उद्घाटन न करता तपासून पाहणारा नेता अजित पवार होते. गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार महान व्यक्तिमत्व गेले हे दुःखदायक आहे’.
अजितदादांच्या नावाने जे करणे शक्य आहे ते करावे’ : अजित गव्हाणे
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ‘ज्या कार्यक्रमात सोबत असायची त्या व्यासपीठावर श्रद्धांजली अर्पण करणे वेदनादायी आहे. प्रत्येकाला त्यांनी मोठे केले. २००७ मध्ये अतिशय तरुण असताना मला स्थायी समिती अध्यक्ष केले. पक्षभेद विसरून आम्ही काम केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून अजितदादांच्या नावाने जे करणे शक्य आहे ते करावे’.
