सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का?

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामुळे पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, मात्र या सोहळ्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यात आले आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीने लढवल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.परंतु, आताच्या घडामोडींनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर टीमने अत्यंत घाईने घेतल्याचे समजते. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी या प्रक्रियेला वेग दिला असून, सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा शपथविधी सोहळा तातडीने पार पडत आहे.सुनेत्रा पवार यांची तातडीने गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर टीमनेच घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही लोक जाणीवपूर्वक पसरवत असल्याने, त्या शक्यतांना पूर्णविराम देण्यासाठीच सुनेत्रा पवार यांच्या निवडीच्या हालचाली इतक्या वेगाने करण्यात आल्याचे समजते. कोअर टीम आणि स्वतः सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शपथविधी लवकरात लवकर उरकून घेण्याची भूमिका पक्षाने मांडली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या नेत्यांनीच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधलेला नाही, असेही सांगितले जात आहे. अजित पवारांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील आणि पक्षाचे विलीनीकरण होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आताच्या घडामोडी पाहता या चर्चेला मोठा खोडा बसला असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, काल बारामतीमध्ये अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या प्रसंगी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या. मात्र, विधी संपल्यानंतर दोघीही वेगवेगळ्या दिशेने रवाना झाल्या. त्यानंतर मुंबईतील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
