पिंपळे गुरवमध्ये महिलांना पुढे करून शिवीगाळ करीत तोडला लोखंडी दरवाजा,पोलीस आयुक्तांकडे संबंधित महिलांवर कारवाईची मागणी

पिंपळे गुरवमध्ये महिलांना पुढे करून शिवीगाळ करीत तोडला लोखंडी दरवाजापोलीस आयुक्तांकडे संबंधित महिलांवर कारवाईची मागणी
पिंपरी, दि. 18 : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई नंतरही मूळ जागेपेक्षा जास्त बांधकाम करून दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण केलेल्या शेजाऱ्यांनी भरीस भर म्हणून भर दुपारी आपल्या शेजाऱ्यांच्या घराचा लोखंडी दरवाजा तोडून सिमेंट काँक्रीट फोडण्याचा संतापजनक प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. विशेष म्हणजे महिलांना पुढे करून अरेरावीची व दमदाटीची भाषा करीत कामगारांच्या साहायाने लोखंडी दरवाजा तोडून टाकून त्रास देण्यात येत आहे. तसेच ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी अरेरावीची भाषा करीत धमकी देणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच महापालिकेने संबंधित बांधकामावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही अरुण पवार यांनी दिला. याबाबत अरुण पवार म्हणाले, की या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच शिवीगाळ व अरेरावीची भाषा करीत कामगारांच्या साहाय्याने लोखंडी दरवाजा तोडणाऱ्या आरोपी कांचन टोणपे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा. माझी जेवढी जागा आहे, त्यामध्ये आम्ही चारही बाजूंना पुरेशी जागा सोडून बांधकाम केले आहे. मात्र, शेजारी पुंजाहरी तुपे व मयत राजेंद्र तुपे यांनी सात/बारा वरील जागेपेक्षा जास्त जागेत थोडीही जागा न सोडता फेस टू फेस बांधकाम केले आहे. त्यामुळे शेजारच्या लोकांना याचा त्रास होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पुंजाहारी तुपे यांनी अतिक्रमण केल्याबद्दल नोव्हेंबर 2018 मध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तुपे यांच्या बांधकामावर कारवाई देखील केली होती. त्यानंतरही त्यांचे अतिक्रमण सुरूच असून, महिलांना पुढे करून काम केले जात आहे. आम्ही ताई, आई, मावशी अशा भाषेत सांगून , ‘आमच्या जागेत बांधकाम करू नका’, असे सांगितले तरी काम सुरूच आहे. याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही डोळेझाक केली असल्याचे दिसते. तुपे हे जागेची मोजणी करायलाही तयार नाहीत. उलट आता तर त्यांनी उच्छाद मांडला असून, महिलांना पुढे करून कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. अरुण पवार यांनी पुढे म्हटले, की आपण घरी नसताना नाहक आरडाओरडा, शिवीगाळ करीत व धमकी देत लोखंडी दरवाजा तोडला आणि ड्रिल मशीनच्या साहाय्याने सिमेंट काँक्रीट फोडून ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतः फेस टू फेस बांधकाम करून दुसऱ्यांच्या जागेतून ड्रेनेज टाकले जात आहे. पाच मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम झाले असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जाणूनबुजून या इमारतीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हे अतिक्रमण काढून टाकण्यात यावे. तसेच अरेरावीची भाषा करीत धमकी देणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली.