हेल्मेट सक्तीच्या बैलाला…

हेल्मेट सक्तीच्या बैलाला…

मार्केटिंग साठी अनेकदा पुणे ते मंचर, पुणे ते नारायण गाव, पुणे ते नगर, पुणे ते खोपोली, पुणे ते सातारा, पुणे ते फलटण, पुणे ते बारामती अश्या अनेक वाऱ्या दुचाकीवर केल्या

यासर्व २२ वर्षात अंदाजे ४ लाख किलोमीटर पेक्षा जास्त ड्रायव्हिंग झाले आहे कारण चारही गाड्या एक लाख पेक्षा जास्त किलोमीटर रानिंग झाल्यावरच विकल्या. ह्या सर्व काळात मी स्वेच्छेने हेल्मेट वापरायचो.

एवढे वर्ष हेल्मेट वापरून सुद्धा कोणताही त्रास जाणवला नाही. पुणेकर म्हणतात तसे टक्कल पडले नाही, पाठ दुखी नाही, मान दुखी नाही. माझ्यासारखे अनेक पुणेकर आहेत जे गेली कित्येक वर्षे स्वेच्छेने हेल्मेट वापरत आहेत. त्यातल्या कोणालाही हेल्मेटचा कोणताही त्रास नाही.

मग पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोध का ?

माझे निरीक्षण आसे आहे की पुणेकरांचा फक्त हेल्मेट ला नाही तर एकूणच वाहतुकीच्या नियमांनाच विरोध आहे.

वाहतुकीचे नियम पाळणे हा पुणेकर भेकडपणा समजतात आणि वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवणे हा पुणेकरांना पराक्रम वाटतो.

पुण्यात ह्या पराक्रमाचे बाळकडू पौगंडावस्थेतच मिळते. आठवी नववीत असणाऱ्या पाल्यांना त्यांचे पुणेकर पालक सर्रास गाडी चालवायला देतात आणि माझा बबड्या/बबडी किती छान गाडी चालवते, वाहतूक पोलिसांना कशी फसवते/ फसवतो, कशी नो एन्ट्री मध्ये गाडी चालवतो/ते, कशी फूटपाथ वरून गाडी चालवून ट्रॅफिक मधून निसटते अश्या अनेक पराक्रमावर चर्चा रंगवतात.

एकूणच पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांचे वावडे असल्याचे आणि पुलंनी म्हटल्या प्रमाणे “पुण्यात वाहन चालवणे हे हत्यार चालवणे ह्या अर्थाने चालवणे आहे” हे पुणेकर वारंवार सिद्ध करून दाखवतात.

सिग्नल तोडून फरार होणे हा पुणेकरांचा आवडता छंद आहे आणि तो पुणेकर जीवापाड जोपासतात.

नो एन्ट्री मध्ये जाणे , फूटपाथ आणि सायकल ट्रॅक वर गाडी चालवणे, लेन ची शिस्त न पाळणे, हे पुणेकरांचे चांगल्या तब्येतीसाठी करायचे व्यायाम आहेत.

डावी उजवीकडे वळताना हात दाखवणे हे पुण्यात अडाणीपणाचे आणि मागासलेपणाचे लक्षण मानले जाते.

कोणत्याही वाहनाला विशेषतः चार चाकी वाहनाला डावीकडून ओव्हरटेक करू नये हा आणि ह्या सारखे अनेक नियम हे इसवीसनाच्या २००० वर्ष पूर्वी पाळायचे नियम होते आणि आता पाळायची गरज पुणेकरांना वाटत नाही.

आता ह्याला फक्त पुणेकर नागरिकच जबाबदार आहेत असा गुलाबी गैरसमज कुणीही करून घेऊ नये.

ह्याला वाहतूक नियमन करणारे आरटीओ कार्यालय सुद्धा तेवढेच जबाबदार आहे.

ज्या प्रमाणे पिठाच्या गिरणीत वरून धान्य टाकले की खालून पीठ पडते त्याच प्रमाणे पुण्याचा आर टी ओ मध्ये एकीकडून फॉर्म टाकला की दुसरीकडून लायसन बाहेर पडते.

एकवेळ सूर्य उगवणार नाही, पण पुण्याच्या आर टी ओ मध्ये गेलेला माणूस लायसन न घेता बाहेर आलाय हे होणे निव्वळ अशक्य आहे.

आता लायसन मिळायला अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्यावी लागते असे तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची घोर अंधश्रद्धा आहे, आणि तुम्हाला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे.

तिथे फक्त ओळख किंवा एक दोन हिरव्या नोटा द्याव्या लागतात मग हे लोक माणसालाच काय माकड, अस्वल, चिंपांझी, गोरिला यांना पण लायसन देतील, म्हणूनच आज पुण्यातल्या रस्त्यावर माणसांच्या जागी माकडेच गाड्या चालवत आहेत असे वाटते.

बरं वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणारे पोलिस खाते सुद्धा काही कमी नाही. पुण्यातील पोलिसांचे मुख्य काम हे वाहतूक नियमन करणे आणि वाहतुकीला मार्गदर्शन करणे हे अजिबात नसून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होई पर्यंत वाट पाहणे आणि मग दंड वसूल करणे हे आहे.

एक वेळ विमा एजंट ला विमा विक्रीचे टार्गेट नसेल पण प्रत्येक वाहतूक पोलिसाला प्रत्येक महिन्याला वसुलीचे टार्गेट दिलं जात असावे असे माझे ठाम मत आहे. आणि हे टार्गेट पूर्ण करायला सिग्नल च्या पलीकडे आणि नो एन्ट्री च्या शेवटच्या टोकाला थांबणे ही हमखास यशाची गुरुकिल्ली आहे. आता ह्या टार्गेट बरोबर अनेक पोलिस कर्मचारी स्वतःची वैयक्तिक टार्गेट ही पूर्ण करतात. थोडक्यात पुण्यातले वाहतूक नियमन हे एकप्रकारे रोजगार हमी योजनेचा च भाग आहे.

बरं वाहतुकीच्या कायद्याबद्दल बोलायचे तर एकूणच आनंद आहे. कधीतरी १८५७ सालात घोडे बैलगाड्या, छकडे आणि टांग्यांच्या साठी केलेले वाहतुकीचे कायदे आज दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना लागू आहेत म्हणजे बघा…

पण हे योग्य आहे का ?

वाहतूक व्यवस्थेबद्दल एक वेगळा परस्पेक्टिव पण आहे.

व्यवसायानिमित्त मी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी, नॉर्वे फिनलंड ला गेलेलो आहे. इथे मी सर्वात जास्त ज्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे तो म्हणजे वाहतुकीची काटेकोर शिस्त.

एकूणच युरोपिअन राष्ट्रांच्या मते वाहतूक व्यवस्था ही तुमच्या सार्वजनिक जीवनाचा आणि सामाजिक व्यवस्थेचा आरसा असते. तुम्ही चारचौघात चालण्याचे, वाहन चालविण्याचे नियमही पाळू शकत नसाल तर मुळातच तुम्ही होमो सेपियन सेपियन, म्हणजे माणूस म्हणवून घ्यायला अपात्र ठरता आणि म्हणूनच फिनलंड सारख्या तुरळक लोकवस्ती आणि त्या पेक्षा तुरळक वाहतूक असलेल्या देशात तुम्हाला वाहतूक पोलीस कधीच रस्त्यावर दिसणार नाहीत. आणि तरीसुद्धा तिथे वाहतुकीच्या नियमांचे अत्यंत काटेकोर पालन होते. भल्या मध्यरात्री, सूनसान रस्त्यांवर, कोणीही बघायला नसताना आणि कडाक्याची थंडी आणि हिमवृष्टी ह्या मुळे कॅमेरे निष्क्रिय झालेले असताना सुद्धा नागरिक वाहतुकीचे नियम मोडत नाहीत.

ते पुढारलेले देश आहेत म्हणून नागरिक नियम पाळतात असे कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत चुकीचे होईल कारण तिथल्या नागरिकांनी नियम काटेकोर पाळायला सुरुवात केली म्हणून ते देश विकसित झाले नाहीतर आपल्यासारखेच राहिले असते…

असो आपल्याला काय करायचे आहे पुढारून वगैरे, आणि वाहतुकीचे नियम पाळून पुढारणे म्हणजे तर अतीच झाले

आणि त्यात सक्ती म्हणजे तर मोगलाईच

ते सुधारणा वगैरे काय आहे ते बाकीचे करतील, शिवाजी महाराज शेजाऱ्यांच्या घरात जन्म घेतील, कोणीतरी टिळक, आगरकर सावरकर, आंबेडकर होतील, फार तर काय भूतान, श्रीलंका, बांगलादेश, बोटस्वाना, झांबिया, चीली, त्रिनिदाद ह्या सारखे चिल्लर देश आमच्या पुढे जातील, पण म्हणून आम्ही नियम पाळायचे, आणि हेल्मेट घालायचे, अरे हट….

त्यामुळेच हेल्मेट सक्तीच्या बैलाला ….

WhatsApp chat