पिंपरी-चिंचवड शहरातील जलपर्णीमुळे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. गळ्यात जलपर्णी घालून नगरसेवक सभेत

पिंपरी -चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना नदीत फोफावलेल्या जलपर्णीमुळे डास झाले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचं चित्र आहे. पालिका प्रशासनाने देखील ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे जलपर्णी अतिरिक्त आय़ुक्ताच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करताना शिवसेना नगरसेवक सचिन भोसले आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळाले. शहरातून जाणाऱ्या पवना नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली असून त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं आहे.जलपर्णीच्या विषयासंदर्भात भोसले यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती.

मात्र, थेरगाव परिसरातील नदीमधून जलपर्णी काढण्यात आली नसल्याने सर्वसाधारण सभेमध्ये गळ्यात जलपर्णी घालूनच भोसलेंनी हजेरी लावण्याचा प्रयत्न केला सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच भोसलेंना आडवण्यात आलं. जलपर्णी गळ्यात घालून सभागृहात जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला.पिंपरी-चिंचवड शहरातील ज्वलंत विषय असणाऱ्या जलपर्णीमुळे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

थेट अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या गळ्यात जलपर्णी घालण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवकांनी केला. त्यांनी प्रवेशद्वाराजवळच बसून संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध केला. जलपर्णी गळ्यात घालूनच सभेत उपस्थिती लावणार असे त्यांनी सुरक्षा रक्षकांना ठणकावून सांगितलं. भोसले यांना साथ देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे सुद्धा पुढे आले. भोसलेंना जलपर्णीसह सभागृहात येऊ द्या अशी मागणी चिखलेंनी केली. सर्वसाधारण सभा चालवू देणार नाही. पुण्यात महानगरपालिकेत सायकल घेऊन जाऊ देतात, एकट्यावर दहा दहा जण दादागिरी करतात असे म्हणून सुरक्षा रक्षकाला चिखले यांनी सुनावले.शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे हे देखील सुरक्षा रक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त भोसलेंना भेटण्यास आले तेव्हा भोसले यांनी आक्रमक होत थेट त्यांच्या गळ्यात जलपर्णी घालण्याचा प्रयत्न केला

.