एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकार येत नाही व कोसळत नाही महाविकास आघाडी सरकार भक्कम -संजय राऊत

मुंबई..महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे . एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. परंतु एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भारतीय जनता पक्षाचे मत कालपर्यंत होते, पण त्याच परमबीर सिंग यांना आज भाजप डोक्यावर घेऊन नाचत आहे. पोलीस आयुक्तपदावरून जाताच परमबीर साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ दिले होते. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच काही लिहिले आहे. परमबीर सिंग असेही म्हणतात की, खासदार डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, त्याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दबाव गृहमंत्री आणीत होते. यावरून मीडिया तसेच भाजपची आदळआपट सुरू आहे.

परमबीर सिंग यांची राज्य सरकारने पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे. अॅण्टिलिया स्फोटके प्रकरणात फौजदार सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहेत. हे सर्व प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही व पोलीस खात्याचीच बदनामी झाली असे मानून सरकारने पोलीस आयुक्तांना हटवले. ”सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा” अशीच भाजपची मागणी होती. आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे.

परमबीर सिंग यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो, मात्र शासनाच्या सेवेत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचे व ते प्रसिद्धी माध्यमांना पोहोचवायचे हे शिस्तीत बसत नाही. परमबीर सिंग हे नक्कीच एक धडाकेबाज अधिकारी आहेत. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या. सुशांत राजपूत प्रकरणात त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चांगला तपास केला. त्यामुळे सीबीआयला शेवटपर्यंत हात चोळत बसावे लागले. कंगना या नटीचे प्रकरण त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले, पण अॅण्टिलियाप्रकरणी त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले. हे खरे असले तरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने असे पत्र लिहून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही.