इतिहास पाहिला तर भाजपनं खोटे आरोप करण्याची प्रथा.

“पुणे ( प्रतिनिधी ) भाजपाच्या नेत्यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण असो किंवा इतर कोणतं प्रकरण असो. आजवर केलेल्या आरोपांचं पुढं काय झालं? कुणीही उठतो आणि महाराष्ट्राची बदनामी करत सुटतो. हे काही योग्य नाही. महाराष्ट्राची जनता भाजपनं चालवलेला खेळ कधीच विसरणार नाहीत. फडणवीसांनी मिळवलेला सीडीआर देखील खोटा असून ते फक्त खोटे आरोप करुन महाराष्ट्राच्या प्रतिमेवर चिखल उडवण्याचं काम करत आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.
“फडणवीस दिल्लीला जाऊन सीडीआर देतात. पुरावे देतात. पण मुळात फडणवीसांकडे हे पुरावे आलेच कसे? राज्यात एटीएसनं अतिशय योग्यपणे तपास करत अंतिम टप्प्यात तपास आलेला असतानाच एनआयए कोर्टात जाऊन तपास स्वत:कडे घेतं. फडणवीसांनी आरोप केले म्हणजे प्रत्येकाला दोषी ठरवून राजीनामा घेत बसायचं का? देवेंद्र फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?”, असा सवाल उपस्थित करत नाना पटोले यांनी”भाजपनं सुरू केलेला आरोपांचा सपाटा हा राज्य सरकारची नव्हे, तर महाराष्ट्राची बदनामी करणारा आहे. त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. भाजपनं आजवर केलेल्या आरोपांचं काय झालं याचा इतिहास पाहिला तर खोटे आरोप करण्याची प्रथा त्यांनी सुरू केलीय”, अस म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील घडामोडींवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

फडणवीसांची चौकशी होणार का?
अवैध पद्धतीनं सीडीआर मिळवल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार का? असं विचारण्यात आलं असता नाना पटोले यांनी सूचक इशारा दिला. “राज्याच्या गोपनियतेला धोका पोहोचवण्याच्या गोष्टी पुढे येत असतील आणि एक राज्य म्हणून ते धोकादायक ठरत असेल, अवैध पद्धतीनं काही घडत असेल तर काँग्रेस पक्ष म्हणून नक्कीच अशा लोकांच्या चौकशीची मागणी करेल”, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपवाले काय दुधाचे धुतलेले आहेत का?
आता विरोधी पक्षात गेलेले भाजपचे नेते हे काय धुतलेल्या तांदळाचे आहेत का? यांच्या काळातही अनेक घोटाळे झालेत. भाजपवाल्यांनी उंदरांनाही सोडलं नाही. उंदीर घोटाळे, चहा घोटाळे यासारखे घोटाळे भाजपच्या काळात झालेत, असा खळबळजनक दावा यावेळी नाना पटोले यांनी केला.

Latest News