बंडू मारकड पाटील यांनी मेंढपाळांना मिळवून दिली नुकसान भरपाई,केमिकल मिश्रित पाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यु प्रकरण…

बंडू मारकड पाटील यांनी मेंढपाळांना मिळवून दिली नुकसान भरपाईकेमिकल मिश्रित पाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यु प्रकरण…
पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर सोडलेले केमिकल मिश्रित पाणी पिऊन सात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मेंढपाळ बाळू कोकरे व शिवा कोकरे या समाजबांधवांना चिंचवडेनगर येथील सद्गुरू बाळूमामा बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेऊन संबंधित दोषी कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून दिली. केमिकलमिश्रित पाणी कुठेही रस्त्यावर सोडून औद्योगिक वसाहतीतील कंपन्या मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळत आल्या आहेत. त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. गेल्या 7 एप्रिल रोजी असाच निष्काळजीपणा मेंढ्यांच्या जीवावर बेतला. यामध्ये केमिकलयुक्त पाणी पिल्याने सात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत मेंढपाळांनी चिंचवडेनगर येथील सद्गुरू बाळूमामा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व ऑल इंडिया धनगर समाज महासंंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील व सामाजिक कार्यकर्ते काका मारकड यांच्याकडे मदतीचे आवाहन केले. याची तात्काळ दखल घेत बंडू मारकड यांनी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत पुजारी, पोलीस उपनिरीक्षक अशोक टोके व अन्य काही पोलिसांसमवेत घटनास्थळाची पाहणी केली व संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करून मेलेल्या मेंढ्या शवविच्छेदनासाठी औंध येथे पाठवल्या. तसेच संबंधित कंपनीकडून मेंढपाळ बाळू कोकरे व भिवा कोकरे यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. यापुढेही धनगर समाज बांधवांनी अडचणीच्या काळात संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन बंडू मारकड पाटील यांनी केले आहे.