कोणाचा दबाव आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासीयांना सांगावे- महापौर माई ढोरे


पिंपरी(प्रतिनिधी ) चिंचवड शहरातील ५० हजार नागरिकांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर त्या प्रस्तावास तसेच १५ कोटी रुपये खर्चास स्थायी समिती व पालिका सभेने मान्यता दिली. मात्र, आयुक्तांनी याची अंमलबजावणी केली नाही, त्यावरून भाजप विरुद्ध आयुक्तांमध्ये संघर्ष सुरु आहे
.आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना पिंपरी पालिकेच्या वतीने तीन हजार रुपये मदत देण्याची घोषणा करून अडचणीत आलेल्या भाजपने याचे खापर पुन्हा एकदा आयुक्त राजेश पाटील यांच्यावर फोडले आहे. भाजपला अडचणीत आणण्यासाठी आयुक्तांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप महापौर माई ढोरे यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला
. भाजपचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत याच मुद्दय़ावरून आयुक्तांवर जोरदार टीका केली. महापौर ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते. आपत्तीच्या वेळी अशी आर्थिक मदत देण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार सभेने एकमताने निर्णय घेतला.याची अंमलबजावणी बंधनकारक असतानाही आयुक्त राजकीय दबावातून जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला.
महापौर ढोरे म्हणाल्या,की हातावर पोट असणाऱ्यांना आधार देण्यासाठी ही मदत आहे. सर्व कायदेशीर बाजूंची पडताळणी करूनच सभेत ठराव झाले आहेत. संकटाच्या काळात काही दिवसांसाठी का होईना त्यांना आपले पोट भरण्यासाठी आधार मिळाला असता. परंतु, आयुक्तांनी राजकीय दबावाखाली गोरगरीब जनतेला मिळणाऱ्या मदतीत खोडा घातला. कोणाचा दबाव आहे,
हे आयुक्तांनी शहरवासीयांना सांगावे. या मदतीचे वाटप त्यांनी तातडीने करावे. अन्यथा, आम्ही लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या मार्गाने आयुक्तांना जाब विचारूच, जनताही त्यांना दिसेल तिथे अडवून जाब विचारेल, असा इशारा महापौरांनी दिला आहे.