शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर…


आता हा विषय संपायला हवा असं आम्हालाही वाटतं. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपचे कार्यकर्ते सक्षम असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.शिवसेना भवनाच्या समोर भाजपने केलेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या राड्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपला उत्तर देऊ असं म्हटलं होतं. या राड्याला त्यांनी समर्थन दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.आपलं राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात चालू असलेल्या आशा वर्करच्या आंदोलनावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान, आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीत काम केलं. त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या पण ‘हम करे सो कायदा’ असं चालू असून याचा आपण निषेध करत असल्याचं पाटलांनी सांगितलं.