पुणेतील मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्याला सुरक्षा रक्षकाने पकडले…

पुणे : पुणे शहरातील बोपोडीतील हॅरिस पुलाजवळ मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्याला सुरक्षा रक्षकाने पकडले. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीच्या 40 किलो लोखंडी पट्टया जप्त करण्यात आल्या. नितीन मोहीतराव गायकवाड (वय 28, रा. गोपाळ वसाहत, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मेट्रोतील प्रशासकीय कर्मचारी मयूरेश साळवणे यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बोपोडीतील हॅरिस पुलाजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. पुलाजवळ मेट्रोने लोखंडी पट्टया ठेवल्या होत्या. रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गायकवाड आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या साथीदाराने लोखंडी पट्टया चोरल्या. पोत्यात भरून दोघे निघाल्याचे सुरक्षारक्षक शशिकांत सोनके यांनी पाहिले असता त्यांनी गायकवाड याला पकडले.

त्याच्याबरोबर असलेला साथीदार पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Latest News