पुण्यातील मांजरी खुर्द स्मशानभूमीत टोळक्यानं केली तरुणांची हत्या

पुणे :: उसने पैसे परत न दिल्याच्या कारणातून रविवारी यांच्यात चांगलाच वाद झाला होता. पुण्यातील मांजरी खुर्द परिसरातील स्मशानभूमीत पाच जणांच्या टोळक्यानं एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
विकास लक्ष्मण सोनवणे असं हत्या झालेल्या 31 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यानजीक असणाऱ्या मांजरी खुर्द येथील रहिवासी आहे. मृत विकास हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होता. संबंधित आरोपींनी मृत विकासचा मित्र गायकवाड याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. बरेच दिवस झाले तरी आरोपी पैसे परत करत नव्हते. .
संतापलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करत मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच संपवलं आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
उसने पैसे परत न केल्यानं वाद झाल्याची माहिती गायकवाडने आपला मित्र विकास सोनवणे याच्या कानावर घातली. त्यामुळे रविवारी रात्री अकराच्या सुमारास विकास आरोपींच्या घरी पैसे परत का करत नाही? असा जाब विचारायला गेला होता. पण याठिकाणी विकास आणि संबंधित पाच आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. यातूनच संताप अनावर झाल्यानं पाच आरोपींनी विकासला घराजवळ असलेल्या स्मशानभूमी परिसरात नेलं. याठिकाणी आरोपींनी विकासवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की पुढच्याच मिनिटांत विकास रक्ताच्या थारोळ्यात पडला
. या घटनेची माहिती मिळताच, लोणीकंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.