पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची मालिका कायम…
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे शहरात वैयक्तिक वाहन प्रवास करणाऱ्यांमध्ये भर पडत आहे. अरूंद रस्ते, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची मालिका कायम आहे. मात्र, अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिसांसह महापालिका प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब मारणाऱ्यांकडून स्वंयशिस्तीला तिलाजंली दिली जात आहे.
वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, मोटार चालिवताना सीटबेल्टचा वापर न करणे, सुसाट वाहने चालविणे, सिग्नलवर वाहतूक कर्मचारी न दिसल्यास नियमभंग करणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
पुणे शहरातील विविध भागात नागरिकांकडून वाहतूक निमयांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ते अपघातात दिवसाआड एकाचा मृत्यू होत आहे.
वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करणे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रीपलसीट प्रवास, अतिवेगाने वाहन दामटणे, सिग्नल तोडणे असे प्रकार होत असल्याने ते अनेकांच्या जीवावर बेतले आहे. जानेवारी ते 11 ऑगस्टपर्यंच्या कालावधीत शहरातंर्गत 394 अपघातांमध्ये तब्बल 134 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये बहुतांश तरूणांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
अवजड वाहनचालकांचा बेशिस्तपणा, डिझेल वाचविण्यासाठी गाडी न्यूट्रल करून चाललेला जीवघेणा खेळ, अरूंद रस्ते, अतिक्रमण, दुचाकीस्वारांची वेडीवाकडी वळणे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे बेशिस्तांना लगाम घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, काही तरूणांना महागड्या गाड्यांची स्टंटबाजीही जीवघेणी ठरल्याचे दिसून आले आहे
. शहरातील विविध भागात झालेल्या अपघाताच आठवड्याभरात सहा तरूणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दोन्ही तरूण दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास वानवडी परिसरातील भैरोबानाला पेट्रोलपंपासमोर झाला. दुसऱ्या घटनेत भरधाव मोटार चालवून पीएमपीएल बसला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.15) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील भेकराईनगर बस डेपोसमोर घडला.
तिसऱ्या घटनेत भरधाव वेगात दुचाकी चालवून स्पीड ब्रेकरवर गाडी उडाल्यामुळे खांबाला धडकून तरूणाला जीव गमवावा लागला आहे. अपघातात त्याचा मित्र जखमी झाला आहे. हा अपघात चंदनगर बीआरटी बसस्थानकाजवळ 10 ऑगस्टला घडला. त्याशिवाय भरधाव टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. हा अपघात नवीन कात्रज बोगद्याजवळ झाला.
पुण्यात रस्ते अपघाताची सद्यःस्थिती
2021 (11 ऑगस्टपर्यंत)
- एकूण अपघात – 394
- गंभीर अपघात-134
- एकूण मृत्यू – 134
- गंभीर जखमी-228
- किरकोळ जखमी-64
शहरातील अनेक ठिकाणी वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.
वाहतूक विभागाकडून वारंवार जनजागृती करूनही वाहन चालकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. बेशिस्तपणा कमी झाल्यास गंभीर अपघातांसह किरकोळ अपघातही रोखण्यास मदत होणार आहे. ब्लॅक स्पॉट काढणे, अत्यावश्यक वाहतूक सूचनांचे फलक बसविणे, अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे.
– राहूल श्रीरामे, वाहतूक पोलीस उपायुक्त, पुणे शहर