औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड कुटुंबाविरुद्ध मोका…

पुणे- कौटुंबिक छळासह खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जावयासह आठ जणांविरुद्ध पुणे पोलिसांनीही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यापुर्वीच गायकवाड कुटुंबावर ‘मोका’नुसार कारवाई केली आहे, त्यापाठोपाठ पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही त्यांच्याविरुद्ध ‘मोका’चा बडगा उगारला

.नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध), सोनाली दिपक गवारे (वय 40), दिपक निवृत्ती गवारे (वय 45, दोघेही रा. गजानन महाराज मंदिराजवळ, शिवाजीनगर), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसीडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, मुळ रा. श्रीरामपुर, नगर), सचिन गोविंद वाळके, संदिप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.त्यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

. संबंधीत गुन्ह्यात संशयित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे देऊन, पैशांच्या वसुलीसाठी गोळीबार करीत, जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या.

व्याजाच्या पैशातुनच लोकांच्या जागा, वाहने बळकावून बेहिशोबी संपत्ती जमविल्याचा पोलिसांना संशय होता. नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा व साथीदारांनी मागील काही वर्षात खुनाचा प्रयत्न, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, कट रचून फसविणे, अवैध खासगी सावकारी केल्याबाबतचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

नानासाहेब गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व साथीदारांची संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून विविध गुन्हे केले आहेत. प्रतिष्ठीत व महत्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण करून गरजू व्यक्तींना बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत, त्यांच्याकडून मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे.

त्याच्याविरुद्ध ‘मोका’अंगर्तत कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुर्व प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी मंजुरी दिली.

या प्रकरणाचा तपास विश्रामबाग विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Latest News