पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य शहराच्या विकासात अडथळा येऊ नये म्हणून सहभागी : राजू मिसाळ

पिंपरी :स्थायी समितीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका मांडली. शहराच्या विकासात अडथळा येऊ नये तसेच कारभार सोयीचा व्हावा, यासाठी आमचे सदस्य स्थायीच्या बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला. शहरातील विविध समस्येवर बोलण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे सांगितल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेत घडलेल्या लाचखोरी प्रकरणानंतर मोठा आकांडतांडव करत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. याचे राजकीय भांडवल करत स्थायी समितीच्या बैठकांवर बहिष्कार घालण्याची घोषणाही जाहीर केली होती. मात्र या घोषणेला आठ दिवस होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या सदस्यांना आपल्याच पक्षाच्या भूमिकेचा विसर पडल्याने या सदस्यांनी आज झालेल्या (दि. 8) स्थायीच्या बैठकीला हजेरी लावत लाचखोरांच्या पंक्तीत आम्हीही असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावर आणलेल्या एकाही विषयाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध न करता मंजूर करण्यात मदत केली.

स्थायी समितीमधील लाच प्रकरणात अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना अटक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने सातत्याने आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच स्थायी समिती बरखास्त करण्याचीही मागणी केली होती. गत आठवड्यात (बुधवार दि. 1) झालेल्या स्थायीच्या बैठकीवर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकत आम्ही त्यांच्या पापात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही बहिष्काराची घोषणा केली होती.

मात्र, अवघ्या आठवडाभरात म्हणजे आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांनी सहभाग घेतला. चुकीच्या पद्धतीने मुदतवाढ, सल्लागारांवर कोट्यवधींची उधळपट्टी, आयत्यावेळी कोट्यवधींच्या विषयांना मान्यता देण्यासारख्या एकाही विषयाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध केला नाही. स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर या चुकीच्या कामांना आता तरी राष्ट्रवादी विरोध करेल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात सदस्यांना विषयपत्रिकेवरील विषयच माहिती नसल्याचे समोर आले आहे.

ज्या प्रकारामुळे सत्ताधारी भाजपवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अवघ्या आठच दिवसांत कारभार सुरू केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. साडेचार वर्षांत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाजपच्या चुकीच्या कारभाराबद्दल एकही ‘ब्र’ शब्द काढला नाही. स्थायी समितीमध्ये कोट्यवधींचे विषय बिनबोभाट मंजूर झाले. मात्र, लाचखोरीनंतर टक्केवारीचे गणित उघडे पडले. त्यानंतर तरी राष्ट्रवादीचे सदस्य विरोध करत विरोधकांची भूमिका बजावतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, ती आज फोल ठरली. स्थायीतील टक्केवारीच्या लालसेपोटीच या सदस्यांना पक्षाच्या भूमिकेचा अवघ्या सात दिवसांत विसर पडल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.


.


स्थायीच्या बैठकीत सहभागी होण्याच्या भूमिकेचे समर्थन करत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी अक्षरश: कहर केला. स्वत:ला आणि स्वत:च्या पक्षाला नैतिकतेचा विसर पडल्याचे सिद्ध झाल्यानंतरही शहरवासीयांना काहीच समजत नसल्याच्या भूमिकेत जाऊन त्यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपने स्थायी समितीची सभा घेऊन निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. स्थायी अध्यक्षांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. महापौरांनी स्थायी समिती बरखास्त करावी.’ अशी मागणीही त्यांनी केली. मिसाळ यांना आपल्या पक्षाच्या सदस्यांनी व स्वत: घेतलेल्या भूमिकेचा मात्र विसर पडला.

Latest News