‘लग्नाचे आमिष’ 50 हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 50 हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर बेड्या घातल्या आहेत. प्रेमराज थेवराज डिक्रुज (Premraj Thevraj D’Cruz) असं या व्यक्तीचं नाव असून तो मुळचा चेन्नईचा आहे. अटक केल्यानंतर या 30 वर्षाच्या प्रेमराजचा हा प्रताप ऐकून पोलिसांनीही कपाळावर हात मारुन घेतला.

अगदी एखाद्या चित्रपटाची कहाणी शोभेल अशा पद्धतीने या प्रेमराजने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. आपण मोठा उद्योगपती असल्याच्या बतावण्या करुन त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला. अनेकींनी त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि साखरपूडाही केला. त्यानंतर त्याने तो संबंधित महिलांकडून लाखो रुपये उकळायचा. 

प्रेमराज थेवराज डिक्रुज या व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या व्यक्तीची अधिक माहिती घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अटक करताना पोलिसानी त्याच्याकडून सात मोबाईल फोन, अनेक सिम कार्ड, दोन पॅन कार्ड आणि दोन आधारकार्ड तसेच बनावट पासपोर्टसहित अनेक कागदपत्रे जप्त केली.

ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच हा प्रेमराज पोपटाप्रमाणे बोलू लागला आणि आतापर्यंत देशभरातील किती महिलांना फसवले, कसे फसवले, त्यांच्याकडून किती रुपये उकळले याची सविस्तर माहिती देऊ लागला.

आतापर्यंत पुणे, ठाणे, मुंबई, चेन्नई, गांधीनगर, सुरत अशा अनेक शहरातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Latest News