पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार: सदाभाऊ खोत

नांदेड : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम खातं आहे, त्यांच्याच जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शेतकऱ्यांना मदत द्या आणि मत मागा. नाहीतर घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा, असं नको व्हायला, असा सल्लाही खोत यांनी मतदारांना दिला आहे.
अशोक चव्हाण हे भाग्यवान माणूस आहेत. सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण, त्यांनी लाचार होऊन मंत्रीमंडळात सामील झाले आहेत. तसेच सरकार मधील लोक नोटा मोजून थकले आहेत. त्यामुळं या निवडणुकीत पैश्यांचा मोठा वापर होणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा आणि मतदान साबणेंना करा, असं आवाहन खोत यांनी मतदारांना केलं आहे.
राज्यातील नांदेड मधील देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू आहे. भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज सुभाष साबणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपचा जाहीर मेळावा पार पडला. भाजपचे मित्रपक्ष असणारे सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर या मेळाव्यात टीका केली
विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार आहे. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येतील. त्या सर्वांनी पीर विम्याचे चार हजार कोटी वाटून खाल्ले आहेत. त्यामुळं अतिवृष्टीनंतर हे सरकार आपल्याला काय देणार?, मला खात्री आहे की, हे सरकार काहीच देणार नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.