राजकीय बदला घेण्यासाठीच मोदी सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर करतंय …

.मुंबई : केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत असून या वापरामुळे या संस्थांबद्दलचा आदर कमी झाला आहे. भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?, असा प्रश्न देखील राजु शेट्टी यांनी भाजपला केला आहे

. राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून सीबीआय, ईडी, एनसीबी या केंद्रीय यंत्रणाभोवती फिरताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित व्यक्ती आणि साखर कारखान्यांवर ईडीने छापे टाकले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजु शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कुणीच वाली राहिलेला नाही आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. राज्य सरकार मदत करत नाही त्याचबरोबर केंद्राचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त गोड बोलतात, तोंडी आधार देतात, जे द्यायचे ते थेट द्या, असंही राजु शेट्टी म्हणाले.दरम्यान, अलिकडेच मुंबईतील क्रूझ पार्टीवर एनसीबीच्या धाडी, त्यानंतर अजित पवारांच्या संबंधित व्यक्तीवर आयकर विभागाचे छापे. या दोन्ही घटनानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात अनेक राजकीय नेते टीकाटिप्पणी करताना दिसत आहे.