पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटामध्ये सांगलीमध्ये राडा…
सांगली : आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे (bjp) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटामध्ये सांगलीमध्ये राडा झाल्याचे वृत्त आहे.या धुमश्चक्रीमध्ये गोपीचंद पडळकर यांची गाडी फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमधील आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली आहे. आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीचे गट आमने-सामने आले.
दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर वातावरण आणखी चिघळले. पडळकर यांची गाडी फोडली असून त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहे. या धुमश्चक्रीमध्ये काहीजण जखमी झाल्याची माहितीसमोर आली आहे.
या राड्यामुळे आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आटपाडीमध्ये पोलिसांची अधिक कुमक वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन वाद झाल्याचे कारण समोर आले आहे.
त्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा पोहोचला आहे. या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यास गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे
. या घटनेनंतर आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.तर जखमी राजू जानकर यांनी आमदार पडळकर यांच्यावर शिवीगाळ करत दुखापत केल्याचा आरोप केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नातेवाईकास राष्ट्रवादी गटात उमेदवारी मिळाल्याने पडळकर यांनी संतप्त होऊन हा प्रकार केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे.