प्लाॅगेथाॅन मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनवावे : महापौर माई ढोरे

पिंपरी, दि. २० नोव्हेंबर २०२१ :- . २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्लॉगेथॉन मोहिम आयोजित केली आहे. शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, बचत गट, हॉटेल असोसिएशन, कलाकार, पर्यावरणप्रेमी, खेळाडू, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने प्लाॅगेथाॅन मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे
.महापालिकेने उद्या, रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत प्लॉगेथॉन मोहिम आयोजित केली आहे. शहरातील ३२ प्रभागातील ६४ ठिकाणी ही मोहिम राबविली जाणार आहे. मोहिमे अंतर्गत प्लॅस्टीकसह इतर कचरा गोळा केला जाणार आहे.
मोहिम यशस्वितेसाठी महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. शहरातील स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, बचत गट, हॉटेल असोसिएशन, कलाकार, पर्यावरणप्रेमी, खेळाडू, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे यासाठी मुख्यालय तसेच क्षेत्रीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या.
सर्वांनी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला आहे. लोकसहभागामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी ही चळवळ निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास महापौर ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाबरोबरच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वच्छतेविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत
. दरम्यान, महापालिकेने निश्चित केलेल्या ६४ ठिकाणी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या ठिकाणांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून फेसबुक पेजवर देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत. शिवाय महापालिकेचे पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचाही सहभाग असणार आहे.
या मोहिमेमध्ये संकलित केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कच-यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या नजीकच्या ठिकाणी सहभाग नोंदवून आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आपला परिसर स्वच्छ असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे स्वच्छतेचा आग्रह घरोघरी पोहोचविण्यासाठी महापालिकेने स्वच्छाग्रह मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या शहराला स्वच्छ करुन सुंदर बनविण्यासाठी नागरिकांनी प्लाॅगेथाॅन मोहिमेला भरभरुन प्रतिसाद द्यावा.