रुपाली पाटील यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश…


पुणे : परिस्थिती बदलत नसेल तर आपल्यात बदल करावा. त्यामुळे मी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी योग्य व्यक्तीमार्फत या सगळ्या गोष्टी राज ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. मात्र, आता मला त्यावर पुन्हापुन्हा बोलायचे नाही. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मी मनसेत असल्यापासून अजित पवार पुण्यात पालकमंत्री म्हणून करत असलेले काम बघत आले आहे.
अजितदादांचा अधिकाऱ्यांवर असलेला वचक आणि कायदेशीर काम कमीतकमी वेळात पूर्ण कसं करायचं, हा गुण वाखाणण्याजोगा आहे. आम्ही दुसऱ्या पक्षात असूनही त्यांनी आम्हाला नेहमीच मदत केली. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही मी त्याच आक्रमकतेने आणि माझ्या शैलीतच काम सुरु ठेवणार आहे. अजितदादांनी त्यासाठी पाठिंबा दर्शवल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले
कदाचित माझ्या पूर्वीच्या पक्षातील लोकांनाच मला राष्ट्रवादीत पाठवायचे असेल, अशी खोचक टिप्पणी रुपाली पाटील यांनी केली
. यावेळी रुपाली पाटील यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. त्यानुसार लवकरच पुण्यात मनसेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. आगामी काळात मनसेतील अनेक महिला पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा रुपाली पाटील यांनी केला.माझ्यासोबत मनसेतील अनेक महिला राष्ट्रवादीत प्रवेश करणार होत्या. मात्र, ते शक्य झाले नाही. सध्या आम्ही चार-पाच जणीच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत
. आगामी काळात पुण्यात एक भव्य मेळावा होईल. त्यावेळी मनसेच्या अनेक महिला पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे रुपाली पाटील यांनी सांगितले.तत्पूर्वी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनीही रुपाली पाटील यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले
. रुपाली ताईंचं काम धडाडीचं आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आता छोटेखानी कार्यक्रम घेतलाय, पुण्यात मोठा कार्यक्रम घेऊ. रुपालीताईंचा मोठा फायदा आपल्याला जिल्ह्यात होणार आहे. चांगल्या महिलांना, कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाणं, हीच राष्ट्रवादीच्या कामाची पद्धत आहे. कोण आता आलाय, कोण मध्ये आलाय, कोण नंतर आलाय, असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जात नाही. ज्यावेळी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत आणलं त्यावेळी काहींना वाटलं, की धनंजय मुंडेंचं आता काय होणार, पण त्याचवेळी त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली गेली.
आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पडली. राष्ट्रवादीत जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला जात नाही. त्याचं कर्तृत्व, कामाची पद्धत, त्याची जनमाणसामध्ये असलेली प्रतिमा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यातून संबंधित व्यक्तीला संधी दिली जाते.