देवस्थान इनाम वर्ग- 3 ला कुळ कायदा लागू होत नाही वक्फ जमिनीवरील कुळांची नावे काढण्याचा आदेश


वक्फ जमिनीवरील कुळांची नावे काढण्याचा आदेश
उप विभागीय अधिकाऱ्यांचा महत्वपुर्ण निकाल
वक्फ मंडळाचे वकील ऍड समीर शेख यांचा युक्तिवाद मान्य
पुणे :
चाकण (ता खेड ) येथील पीर गैबी व पीर पटाईत ट्रस्ट गैबी पिर देवस्थान म्हणजेच वक्फ बोर्डाच्या गट नंबर ८४३ या १७ हेक्टर १७ आर आकाराच्या जमिनीला त्या जमीनी देवस्थान इनाम वर्ग 3 असल्याने व वक्फ कायद्या अंतर्गत येत असल्याने कुळ कायद्याचे कलम “३२ ग” लागू होत नाही, त्यामुळे इतर हक्कात असलेली कुळांची नावे कमी करण्याचा आदेश शेत जमीन न्यायाधिकरण म्हणजेच उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण (खेड ) यांनी दिला आहे . उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात झालेल्या अपिलीय सुनावणीत वक्फ मंडळाच्या बाजूने त्यांचे वकील ऍड समीर शेख यांनी बाजू मांडली होती .
अपिलातील मिळकत खासगी नसून देवस्थान इनाम वर्ग 3 आहे , वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयास अथवा महसूल न्यायालयास नाहीत त्यामुळे कुळांचे कुळ कायद्याचा आधार घेऊन करण्यात आलेले अपील अमान्य करण्यात आले . वक्फ कायदा कलम ५४ नुसार वक्फ च्या मिळकतीतील अतिक्रमण काढण्याचे अधिकार वक्फ बोर्डाकडे आहेत असे देखील सुनावणी दरम्यान स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अतिक्रमणदार यांना कुळ म्हणता येणार नाही ,असा आदेश या सुनावणीत देण्यात आला .
कुळांच्या वतीने ५ जणांनी तहसीलदार यांच्याकडे आणि नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कुळांची नोंद जमिनीवर होण्यासाठी अपील केले होते . ते अंतिमतः फेटाळण्यात आले . पीर पटाईत व गैबी पीर दर्गाह चे विश्वस्त एम.एच.मुजावर यांनी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली .
……