आगामी महापालिका निवडणुकीत प्रस्थापितांना आव्हान देणार – बाबा कांबळे


आगामी महापालिका निवडणुकीत प्रस्थापितांना आव्हान देणार – बाबा कांबळे
- कष्टकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार उभे करणार – बाबा कांबळे
- प्रस्थापित पक्षांकडून कष्टकऱ्यांची दिशाभूल ; प्रश्न सोडविण्यास उदासीनता
पिंपरी (दि. ४ जानेवारी २०२२) पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम मजदूर, असंघटित कामगार, बहूजन कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी कानाडोळा केला आहे. निवडणुकीत कष्टकऱ्यांची मते पाहिजेत, मात्र त्यांची रखडलेली कामे करायला नको, अशी अवस्था आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर, झोपडपट्टी, नागरी प्रश्न व मागासवर्गीय ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कष्टकरी सक्षम राजकीय भूमिका घेणार आहेत. आगामी निवडणुकीत पर्यायी उमेदवार देऊन प्रस्थापितांपुढे आव्हान उभे करू, असे प्रतिपादन कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मंगळवारी (दि. ४ जानेवारी) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, शिवशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, अनिता सावळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, मराठा सेवा समितीचे सदाशिव तळेकर, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, मधुरा डांगे, टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे शहराअध्यक्ष रमेश शिंदे, शोभा शिंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, दिनेश यादव, मुकेश ठाकूर, जयश्री श्रीधर मोरे, मालन गवई, रंजीत शहा, सगुणा शिखरे, राणी तांगडे, सरस्वती गुजलोर, अशोक पासवान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. याबरोबरच पुणे, मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर सह महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रामध्ये व मेट्रो सिटी म्हणून व मोठ्या शहरांमध्ये असंघटित कामगार कष्टकरी यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालक, टपरी, पथारी, हातगाडी, फळभाजी विक्रेते, बांधकाम मजूर, घरेलू कामगार, सफाई कामगार, महिला कंत्राटी कामगार अशा असंघटित कामगार कष्टकरी जनतेची संख्या 10 लाखापेक्षा अधिक आहे. त्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्यांचे प्रश्न घेऊन कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी पथारी हातगाडी पंचायत, कष्टकरी जनता आघाडीसह अनेक संघटनांच्या मार्फत आम्ही लढत आहेत.
बाबा कांबळे म्हणाले की, शहरातील पहिला फेरीवाल्यांचा कायदा, घरेलू कामगार कल्याण मंडळ, बांधकाम मजुरांचे कल्याणकारी मंडळ गोरगरिबांसाठी घरकुल सह अनेक योजना योजना राबविण्यात कष्टकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा मोठा इतिहास आहे. बहुजन मागासवर्गीय कष्टकरी जनतेने राजकीय नेत्यांवर भरोसा ठेऊन भरघोस मतदान केले. अनेकांना सत्तेमध्ये बसविले. त्यानंतर कष्टकऱ्यांचे रखडलेले प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मात्र त्यांचे प्रश्न सुटताना दिसत नाहीत. राजकीय नेत्यांकडून होणारी फसवणूक पाहता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे.