पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आझादी का अमृत महोत्सव निमीत्त ‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ उपक्रमाचे आयोजन:आयुक्त राजेश पाटिल


पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.
आझादी का अमृत महोत्सव निमीत्त ‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ उपक्रमाचे आयोजन
पिंपरी चिंचवड, १४ जानेवारी २०२२ :- स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA), भारत सरकारच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठी देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव (AKAM)’ हा उपक्रम साजरा होत आहे. त्याअनुषंगाने, गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाव्दारे पुरवठा साखळी व्यवस्थापन (SCM) अंतर्गत दि. १७ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत १०० स्मार्ट शहरांमध्ये ओपन डेटा सप्ताह घेण्यात येणार आहे.
शहरी प्रशासनासाठी खुल्या डेटाच्या वापराला चालना देणे, डेटा-चलित प्रशासन चालविण्यासाठी आणि महानगरपालिका सेवांसाठी ओपन डेटाच्या वापरासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत सदर उपक्रम घेण्यात येत आहे, याबाबत स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA), यांचेद्वारे कळविणेत आलेले आहे. त्यानुसार, १०० स्मार्ट सिटी शहरांमध्ये दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी “ओपन डेटा डे” कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
ओपन डेटा संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी यांच्यावतीने व इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि एंटरप्राईस सेंटर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ ते २१ जानेवारी २०२२ रोजी या कालावधीत ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
यामध्ये, १) ब्लॉग लेखन स्पर्धा :- प्रथम – ५,०००/-, द्वितीय – ३,०००/-, तृतीय- २,०००/-.
२) आर्टीकल / डेटा स्टोरिज लेखन स्पर्धा :- प्रथम – १५,०००/-, द्वितीय -१०,०००/-, तृतीय – ५,०००/.
३) हॅकेथॉन स्पर्धा :- प्रथम – २५,०००/-, द्वितीय -१५,०००/-, तृतीय – १०,०००/- अशा स्पर्धा व प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचे वाटप व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे. तसेच, ओपन डेटा हॅकेथॉन / इमर्सिव्ह वर्कशॉप / पॅनेल चर्चा / तज्ञांची चर्चा, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील शासकीय कार्यालय आणि इतर सरकारी संस्था, शाळा / महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योग, स्टार्टअप अशा ३४ शासकीय – निमशासकीय व खासगी संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच, नागरिकांना सदर कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून शहर प्रशासनाला चालना मिळणार आहे.
या संदर्भात ब्लॉग, व्हिडीओ तयार करून व सदर स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी संस्था व नागरिकांना दि. १९ जानेवारी २०२२ पर्यंत सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेची संपूर्ण माहिती तसेच नियम व अटी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप आणि https://pcmcsmartsarathi.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश पाटील यांनी दिली आहे.