पुणे महापालिकेच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन

पुणे: पुण्यातून एक दुखद बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वत्सला गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज त्यांचं राहत्या घरी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास निधन झालं. वत्सला 69 वर्षांच्या होत्या. एक महिला असून वत्सला यांनी स्त्री-पुरुष लिंगभेदाच्या भिंती तोडून काम केलं. त्या 1998-99 मध्ये पुणे महापालिकेच्या महापौर म्हणून निवडून आल्या होत्या

वत्सला आंदेकर यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरातील एक-दोन जण प्रत्येक महापालिका निवडणुकीत निवडून येतं. विशेष म्हणजे वत्सला यांनी स्वत: 2012 साली पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं. तरीही वत्सला या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी 2012 ची निवडणूक अपक्ष लढली होती. पण त्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नव्हते. या अपयशानंतर वत्सला यांनी राजकारणातला वावर कमी केला होता. याशिवाय त्यांना गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहाचा त्रास सतावत होता. त्यांची आज राहत्या घरी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली

Latest News