एकाच पक्षातील नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने उमेदवारीचा मोठा पेच

पुणे: पुणे महापालिका प्रभागांची नक्की रचना कशी असेल आणि कोणते प्रमुख भाग प्रभागात असतील, याचे किमान चित्र विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांसमोर आले. त्यानुसार विद्यमान जी प्रभागरचना आहे, त्यात नव्या संभाव्य रचनेनुसार आत्ताच्या अनेक प्रभागांची तोडफोड होऊन ते एकमेकांमध्ये एकत्र आले आहेत.
त्यामुळे एकाच पक्षातील काही नगरसेवक एकाच प्रभागात येऊन उमेदवारीचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या प्रभागांची नावे जाहीर झाल्याने सध्याच्या प्रभागरचनेला नव्या रचनेत उभे-आडवे छेद गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लगतच्या प्रभागातील नगरसेवकांमध्येच थेट लढती होण्याची शक्यता बळावली आहे
.त्यामध्ये प्रामुख्याने वडगाव शेरी, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, काही प्रभागांत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचे नगरसेवक हे थेट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, यासंबंधीचे स्पष्ट चित्र हे आरक्षण सोडतीनंतरच समोर येऊ शकणार आहे.
मात्र, राज्य निवडणूक आयोगाचे 28 जानेवारीला निघालेले आदेश 30 जानेवारीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास व्हायरल झाले. या मधल्या काळात निवडणूक आयोगाने पुन्हा 12 प्रभागांमध्ये बदल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गजांना निवडणुकीपूर्वीच धोबीपछाड देण्यात आल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 6 डिसेंबरला आम्ही प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यानंतर महापालिकेचा प्रभागरचनेशी काहीच संबंध राहिला नाही, असे स्पष्ट केले.
प्रभागांच्या नावांनुसार महापालिकेतील आजी-माजी प्रमुख पदाधिकार्यांचे प्रभाग त्यांना अनुकूल असे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील दिग्गज हे एकमेकांसमोर येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदारसंघात येणार्या पदाधिकार्यांचा समावेश आहे
.महापालिकेच्या प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जवळपास 24 बदल केले आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभागरचनेचे वेळापत्रक (कार्यक्रम) जाहीर केल्यानंतरही काही बदल करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे.महापालिका प्रशासनाने शहरातील प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून 6 डिसेंबरला निवडणूक आयोगाला सादर केला. मात्र, या प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप झाल्याने निवडणूक आयोगाने 24 बदल सुचविले. एवढेच नव्हे, तर महापालिका अधिकार्यांना समोर बसवून ते पुन्हा दुरुस्त करून घेतले.