पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतातील बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी, दि. १२ फेब्रुवारी २०२२ :-  प्रसिद्ध उद्योजक आणि माजी खासदार पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतातील बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले असून देशासह पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली.या शहरात बजाज उद्योग समूहाने कारखाना उभा करून मोठ्या प्रमाणावर कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या औद्योगिक नगरीच्या जडणघडणीत बजाज समूहाचा महत्त्वाचा वाटा आहे. बजाज समूहाचे मानद अध्यक्ष असलेले राहुल बजाज हे गेल्या अनेक वर्षासून आकुर्डी येथील बजाज कारखाना परिसरात वास्तव्य करीत होते. ऑटोमोबाईल क्षेत्राला त्यांनी अधिक चालना देऊन बळकटी देण्याचे काम केले. सामाजिक भान असलेल्या आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या राहुल बजाज यांनी कोविड काळात सी एस आर फंडाच्या माध्यमातून औषधे तसेच वैद्यकीय साहित्यासह रुग्णवाहिका वाहनांची देखील महापालिकेला मदत केली.

२ लाख कोविड लसींचा मोफत पुरवठा केला. दुसऱ्या कोविड लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासत असताना राहुल बजाज यांनी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. राहुल बजाज यांचे कार्य औद्योगिक नगरीच्या इतिहासात कायमस्वरूपी अधोरेखित झाले असून शहरातील उद्योजकांसह देशभरातील उद्योजकांना त्यांचे कार्य सतत मार्गदर्शक ठरेल.
समस्त पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, असे महापौर माई ढोरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.जनता संपर्क अधिकारी

Latest News